ठाणे महापालिकेने हाजुरी येथे कंमांड अँड कंट्रोल सेंटर उभारले आहे. ठामपाच्या वतीने सांगण्यात आल्यानुसार संपूर्ण देशातील हे एकमेव सेंटर असेल तर ती ठाणेकरांसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. या सेंटरच्या माध्यमातून ठामपाच्या नागरी सुविधांचे सुसुत्रीकण आणि दैनंदिन कामकाजाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यात येणार असल्याचे ठाणे महापालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे. घनकचरा व्यवस्थापन विभाग, डीजी ठाणे, पाणी पुरवठा, विद्युत विभाग, ई- गव्हर्नन्स, शिक्षण, परिवहन यासह जवळपास सर्व विभागांचे स्वतंत्र कंमांड अँड कंट्रोल सेंटर असणार असून त्या सर्व कमांड अँड कंट्रोल सेंटरला हे मुख्य कमांड अँड कंट्रोल सेंटरशी जोडण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण शहरात मोक्याच्या ठिकाणी तब्बल बाराशे सीसी टीव्ही कॅमेरे बसविले आहेत. हे सर्व कॅमेरे मुख्य कंमांड अँड कंट्रोल सेंटरला जोडले आहेत. ___ याचाच अर्थ ठाण्यात बाराशे कॅमेरांचा 'वॉच' आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ठामपणे राबविलेला हा प्रकल्प अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गुन्हेगारी रोखाण्यासाठी पोलिसांनाही त्याचा लाभ होईल. शिवाय शहरात जवळपास चार हजार सेन्सर्सही बसविण्यात येणार आहेत. हे सेन्सर्स पाईप लाईन फुटल्यास, अपघात घडल्यास, कचरा साठल्यास, चेंबर कव्हर्स तुटल्यास, बस बंद पडल्यास कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये अलार्म वाजवून त्याची सूचना देणार आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत उभारण्यात आलेला प्रकल्प हा ठाणेकरांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल. मात्र, कधी ज्यावेळी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होईल त्यावेळी. नाहीतर मोफत इंटरनेट सुविधेप्रमाणे त्याचाही बोजवारा उडायला नको. नाहीतर गाजावाजा मोठा अन प्रकल्प निघाला खोटा असं व्हायला नको. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी पदभार स्वीकारल्यापासून ठाण्यात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प आणले आहेत. बरेच प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. पण अनेक प्रकल्प फसलेही आहेत. त्यात फक्त त्यांचाच दोष आहे असा नाही. ते राबविणारी यंत्रणाही तितकीच दोषी आहे. अनेक प्रकरणांत आयुक्तांनी निर्णय, आदेश आणि सूचना दिल्याप्रमाणे कामे झालेली नाहीत हे उघड झालेले आहे. बऱ्याच प्रकरणांमध्ये चूक प्रशासनाची आणि बदनामी मात्र आयुक्तांची झालेली दिसते. हा जो प्रकल्प उभारण्यात आलेला तो सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. मात्र, त्याची मदार तर संपूर्ण शहरभर लावलेल्या कॅमेरांवर अवलंबून राहणार आहे. जर कॅमेरे सुस्थितीत तर हे कंमांड अँड कंट्रोल सेंटर उत्तम काम करणार. जर कॅमेरे बंद तर कामही बंद...! हा प्रकल्प राबविताना एक आराखडा नक्कीच ठरविण्यात आला असेल. कॅमेरे बंद पडले, केबल कापल्या गेल्या किंवा आणखी अडथळा निर्माण झाला तर त्यावर उपाय योजना करण्याचा आराखडा तयार असणार हे नक्की. पण आतापर्यंतचे वास्तव पाहता आराखडे हे कागदांवरच राहिलेले दिसतात. एखाद्या संस्थेला काम दिलं असेल तर ती किती उत्तम काम करते याचे उत्तम उदाहरण इंटरनेट सेवेचे आहे. अन स्वतः ठाणे महापालिका काम करणार असेल तर ती कशी काम करते याचे उत्तम उदाहरण मुख्यालयावरील छत्रपती शिवरायांचे विद्रप झालेलं शिल्प आहे. ठाणे महापालिकेच्या सर्व विभागाचे स्वतंत्र कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारून ते मुख्य कमांड अँड कंट्रोल सेंटर जोडण्यात येणार आहेत. शिवाय विभागा विभागातील समस्यांची माहिती व्हावी आणि त्याची तत्काळ सोडवणूक व्हावी म्हणून शहरात सेन्सर्सही बसविण्यात येणार आहेत. ठामपाच्या अधिकारी-कर्मचारी यांना व्यक्तिशः भेटून ठाणेकर आपल्या समस्या मांडत असतात. प्रत्यक्ष भेटीनंतरही समस्या निकाली निघायला महिनोंमहिने लागतात. अशा परीस्थितीत ही यंत्रणा कितपत कार्यतत्पर ठरेल, हा प्रश्नच आहे. आयुक्त साहेब तुमच्या कार्यकाळात तुम्ही पूर्णत्वास आणलेला हा प्रकल्प ठाणेकरांसाठी गौरवपूर्ण आहे. तुम्ही ठाण्यातून बदली होऊन गेलात तरी तुमची आठवण करून देणारा हा प्रकल्प आहे. पण प्रकल्पाचा गौरव अबाधित राहणं हे त्याच्या भविष्यातील प्रशासनाच्या अंमलबजावणीवर अवलंबून आहे. प्रशासनाने ही बाब लक्षात घ्यायला हवी. हा प्रकल्प ठाणेकरांसाठी अभिमानास्पद ठरावा अशा पद्धतीने प्रशासन काम करेल, अशी आशा करूया. तसाही ठामपाच्या नागरी सुविधांचे सुसुत्रीकण आणि दैनंदिन कामकाजाचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी लावलेल्या बाराशे कॅमेरांवर मुख्यमंत्री टीमचा ‘वॉ राहणार आहे. हा प्रचार
...हा प्रकल्प ठाणेकरांसाठी अभिमानास्पद ठरावा!