'साहेब, हा तुमच्या आईचा अपमान नाही का?'


अनधिकृत बांधकामे पाठीशी घालणाऱ्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांना ठाणेकरांचा आर्त सवाल 


सुमारे सात हजार स्क्वे.फुटांच्या अनधिकृत बांधकामास अभय


कारवाईस जाणीवपूर्वक टाळाटाळ; अधिकाऱ्यांची कर्तव्यात कसूर


ठाणे : व्हाट्सअप ग्रुपवर आयुक्तांनी अधिकाऱ्यांची आई-बहीण काढण्याचा प्रकार म्हणजे 'मी माझ्या आईचा अपमान समजतो' असे विधान करणाऱ्या अतिक्रमण विभागाचे सर्वेसर्वा, मुख्यालयातील उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांना नेमून दिलेल्या कर्तव्यात कसूर करीत अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणे हा तुम्हाला तुमच्या आईचा अपमान वाटत नाही का?' असं आर्त सवाल ठाणेकर करीत आहेत.


ठाणे महापालिकेच्या माजिवडा प्रभाग समिती अंतर्गत असणाऱ्या आनंदनगर बस थांब्याजवळ सुमारे सात हजार स्क्वेअर फुटांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आलेले आहे. 'रॉयल पाम वेडींग अॅन्ड पार्टी लॉन्स' हॉटेलचे हे बांधकाम असून सत्ताधारी शिवसेनेचे काही पदाधिकारी सदर हॉटेलचे 'भागीदार' असल्याची माहिती आहे. सदर बांधकाम सुमारे एक ते दीड वर्षापासून सुरू होते. मात्र अतिक्रमण विभागाच्या कोणत्याही अधिकारी- कर्मचाऱ्यांना एवढे अवाढव्य बांधकाम नजरेत आले नाही. याबाबत 'मुख्यमंत्री' वर्तमानपत्रांमध्ये छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध होऊन बांधकाम जमीनदोस्त करण्याची आणि बांधकामधारकांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होताच बांधकामधारकांची तारांबळ उडाली असून कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी बांधकामधारकांनी अतिक्रमण विभागातील वरिष्ठांचे उभरे झिजविणे सुरू केलेले आहे. बांधकामधारकांनी झोळी भरल्याने खुश होऊन अतिक्रमण विभागाच्या वरिष्ठांनी बांधकामधारकांना अभय दिल्याची माहिती आहे. त्यामुळे सदरचे बांधकाम हे अनधिकृत असतानाही त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने अतिक्रमण विभागावर गेल्या आठवड्यात आयुक्तांनी केलेल्या आरोपांना पुष्टी मिळत आहे.


आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गेल्या आठवड्यात अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचे अनधिकृत बांधकाम माफियांशी हितसंबंध असल्याचे आरोप केलेले आहेत. शिवाय ठाणे महापालिका विकायला काढलेल्या आणि महापालिकेशी निष्ठा नसलेल्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. आयुक्तांनी केलेले आरोप उपायुक्त बुरपुल्ले यांनी व्यक्तीशा नाकारले असले तरी आयुक्तांच्या आरोपांत शंभर टक्के सत्य आहे हे सर्वसामान्य ठाणेकरांसह स्वतः बुरपुल्लेही चांगले जाणतात.


हॉटेलचे सुमारे सात हजार स्क्वेअर फुटांचे अनधिकृत बांधकाम आज बिनधाक्तपणे उभा असणे हे त्याचे त्याचे जिवंत उदाहरण आहे. गेल्या पाच वर्षात ठाणे महापालिका हद्दीत अधिकाऱ्यांच्या कृपेने एक दोन नाही तर अशी हजारो अतिक्रमणे उभारली गेली आहेत. 


आयुक्तांच्या शिवराळ शब्दप्रयोगावर आपल्या आईचा अपमान समजणारे उपायुक्त बुरपुल्ले यांना कर्तव्यातील कसूर हा आपल्या आईचा अपमान वाटत नाही का? असा सवाल ठाणेकर करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था असणाऱ्या ठाणे महापालिकेवर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. शेकडो अधिकाऱ्यांची कुटुंबे ठाणे महापालिका पोसत आहे. जन्म देऊन वाढविणारी आई आहे, मग तुमच्यासह तुमच्या कुटुंबांचे पालन-पोषण करणारी ठाणे महापालिका ही सुद्धा तुमची आईच नाही का? असा भावनिक प्रश्न ठाणेकर विचारत आहेत. ठाणे महापालिकेला जन्मदात्या आईप्रमाणेच मानत असाल तर तिची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची नाही का? एखाद्याने नाव न घेता शिवराळ भाषा वापरली तर तो अपमान समजून ८० वर्षांच्या आईला गावावरून बोलावून घेता, मग इथे तुमच्यासह तुमच्या कुटुंबाला पोसणारी आई ठाणे महापालिका हिच्यावर रोज भ्रष्ट्राचारी बलात्कार होतायत, त्यावेळी तुम्हाला राग का येत नाही? तुम्हाला पोसणाऱ्या ठाणे महापालिकेने तिच्या अस्तित्वासाठी काही नियम घालून दिलेले आहेत, कर्तव्य ठरवून दिलेली आहेत. त्या कर्तव्यांत कसूर करताना तो तुम्हाला तुमच्या जन्मदात्या आईप्रमाणे अपमान वाटत नाही का? असा सवाल ठाणेकर करत आहेत. व्हाट्सअप ग्रुपवरील शिवराळ शब्दप्रयोगाने अपमान वाटून गावावरून बोलाविलेल्या ८० वर्षांच्या आईला जरी सांगितलेत तरी कर्तव्यातील कसुरीबद्दल तुम्हाला माफ करणार नसल्याची भावना ठाणेकर व्यक्त करत आहेत.