महाराष्ट्रात नौटंकीचे राजकारण?

महाराष्ट्रातील राजकारणाने जनहिताचा रस्ता सोडून नौटंकीच्या राजकारणाचा प्रवास सुरु केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जे घडले ते घडण्याची शक्यता किंवा स्वप्नही कुठल्या राजकीय नेत्याला पडले नव्हते आणि भाजपच्या नेत्यांना तर नाहीच नाही. पण जे घडायचे ते घडले. भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांना अहंकाराने गिळंकृत केले. तर आमचं ठरलंय म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना डोक्यावर हात मारण्याची परिस्थिती आली. शिवसेनेला तोंडावर पाडण्याचा प्रयत्न केला आणि स्वाभिमानाने पेटलेल्या उद्धव ठाकरे यांनी कुणाच्या स्वप्नात नाही ते शरद पवारांच्या मदतीने वास्तवात आणले आहे. राजकारणात कुणी कुणाचा आयुष्यभराचा मित्र नाही आणि शत्रूही नाही. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर जे काही घडले ते अजब निश्चित आहे. पण अशक्य नव्हते. गरज होती ती सर्वांना सामावून घेण्याच्या मानसिकतेची, बलिदान देण्याच्या मानसिकतेची. अन ती मानसिकता शिवसेनेने आणि राष्ट्रवादी सोबतच काँग्रेसमध्ये जागृत झाली आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला.



महाराष्ट्राला स्थिर सरकार हवे होते. अन ते स्थिर सरकार महाराष्ट्राला मिळाले आहे. प्रशासकीय कामाला आणि जनहिताच्या निर्णयाला सुरुवात झालेली आहे. आता भाजपच्या नेत्यांना याची खात्री पटली की, महाराष्ट्रात पाच वर्ष भाजपची सत्ता येणार नाही. आता पुन्हा नौटंकीची सुरुवात झालेली आहे. थोडक्यात नाव्ह्याचा उकिरडा अगदी जनावरांप्रमाणे उकरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पण काही पक्का पुरावा मिळेनासा झाला आहे. तर केवळ केसंच हाताला लागत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी कार्यरत आहे. महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळाले पण भाजपा नेते अस्वस्थ आहेत. पुन्हा अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि दिग्गज नेते शरद पवार सुरेश साळवे ९३२३३९२९५३ यांचे जाणता राजा प्रकरण, तर नरेंद्र मोदींचे 'आजका शिवाजी नरेंद्र मोदी' या प्रकरणांचा वाद सुरु झाला. महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज जागृत झाले. तिन्ही राजे पुन्हा मैदानात उतरले. यावर पडदा पडतो तोच सत्या वाय पुन्हा ज्यांनी या गचाळ राजकारणाचा आणि जगाचा निरोप घेतला त्यांच्या नावाने शिमगा करण्याचा घृणास्पद प्रकार सुरु झाला आहे. वास्तविक पाहता देशात गरिबी हटाव चा खऱ्या अर्थाने प्रयत्न आणि गरिबी हटविण्यात जेवढे यश इंदिरा गांधी यांना आले तेवढे यश आजवरच्या कुठल्याच पंतप्रधानाला मिळाले नाही.


त्या खालोखाल राजीव गांधी यांनाही काही प्रमाणात यश मिळाले. मात्र त्यानंतर केंद्रात सत्ता कोणाचीही असो सगळ्यांना अपयशच मिळाले हे वास्तव आहे. आज महाराष्ट्रात सर्वाधिक वादळे आणि नाव्ह्याचे उकिरडे उकळण्याचा प्रयत्न होत आहे. सेनेला राष्ट्रवादीशी तर कधी काँग्रेसशी भिडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कारण महाराष्ट्र स्थिर झाला आहे हे भाजपच्या पचनी पडेना. म्हणून या सगळ्या गोष्टी आणि गाडे मुडदे उकरण्याचा प्रयत्न होत आहे. इंदिरा गांधी यांनी करीम लाला यांची भेट घेतली. यात नवीन काय ? राजकारणाशी किंवा सर्वसामान्य माणसाच्या जटिल समस्यांशी याचा काय संबंध आहे. इंदिराजी आज नाहीत. करीम लाला याच्याशी भेट हा मोठा इशू कशाला? बाळासाहेबांशी हाजी मस्तानचे संबंध होते. हे आजच प्रसारमाध्यमाला किंवा नेत्यांना माहिती पडले काय ? हे जगजाहीर आहे. अन आजचे नेते हे अंडरवर्ल्ड डॉन यांच्या संपर्कात नाहीत काय? यांचे संबंध अशा लोकांशी नाहीत काय? मग दुसऱ्याकडे बोट दाखविताना स्वतः कडे किती बोटे आहेत याचा विचार होणे गरजेचे आहे. नसत्या गोष्टींना बाहेर काढून आज विरोधक किंवा प्रसारमाध्यम काय सांगू इच्छितात हे कळने कठीण आहे. अन आजचे पक्षच काय कुठलेही नेते असो हे स्वच्छ धुतलेल्या तांदळासारखे आहेत काय? त्यांच्यावर कधीच आरोप झाले नाहीत काय? याचे उत्तर प्रथम मिळवावे आणि नंतर राजकारणाच्या आरोपांची गंभीरता घ्यावी. आज अनेकांचे गुप्त संबंध आहेत. तेव्हा त्यांनी याचा विचार करू नये आणि आज इंदिराजी आणि करीम लाला जिवंत नाहीत. दुसरीकडे हाजी मस्तान आणि बाळासाहेब चांगले मित्र होते. असतील यात काय? आज बाळासाहेब हयात आहेत का ? हाजी मस्तान हयात आहेत काय ? उगीच जगात नसलेल्या लोकांचा इतिहास काढून राजकारणात वादळ उठवायचे आणि त्या वादळाला चक्री वादळ बनवून राजकारणात सरशी करण्याचा प्रयत्न करणे कितपत शहाणपणाचे आहे. पण हा सर्व खटाटोप मात्र केवळ महाराष्ट्रात सुरु असलेल्या स्थिर सरकारची कोंडी फोडून सरकार पाडण्यासाठी आहे.